नागपूर :राज्यात ज्यावेळी समाजाचे प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी ते प्रश्न पक्षीय राजकारणापलीकडचे असतात. त्यामध्ये सरकार किंवा विरोधी पक्ष या सर्वांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. ही जी बैठक आहे, यामध्ये मराठा समाजच्या सर्व मागण्या आणि प्रश्नांचा नीट एकत्रितपणे विचार करायचा असतो. राज्याने यावर राजकारण न होऊ देता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल, याचा प्रयत्न करायचा असतो. तो, केला जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. ते आज नागपूर येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानंतर माध्यमांसोबत बोलत होते.
उपोषण मागे घेण्याचं आवाहन :मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा केलीय. त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलंय. लोकशाहीमध्ये उपोषण महत्वाचं आयुध आहे, त्याला मान्यता आहे असं देखील ते म्हणाले आहेत. कोणताही निर्णय घेताना सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयाचा विचार देखील करावा लागतो. प्रश्न सोडवायचे असेल, तर ते कायद्याच्या चौकटीवर टिकले देखील पाहिजे. अन्यथा उद्या समाज म्हणेल की, तुम्ही आमची फसवणूक केली. निर्णय घेतांना सर्वांनी मिळून सकारात्मक विचार केला, तर समाजाचे भलं होईल असं मत फडणवीसांनी व्यक्त (Devendra Fadnavis Reaction on Maratha Reservation) केलंय.