नागपूर - २०१४ विधानसभा निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपावल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाले. यासंदर्भात बहुचर्चित वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती लपवलेली असल्यानं त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली असून, ५ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
युक्तिवाद पूर्ण - २०१४ च्या निवडणूक शपथपत्रात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपावल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी केला होता. सतीश उके सध्या ईडी कोठडीत आहेत, त्यामुळं सतीश उके यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपला युक्तिवाद पूर्ण केला होता. उके यांच्या बाजूनं युक्तिवाद आणि साक्षीपुरावे नोंदविण्याची प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली आहे. दोनही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानं आता या याचिकेवर ५ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
देवेंद्र फडणवीसांची साक्ष पूर्ण -न्यायालयीन प्रक्रिये अंतर्गत ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांना स्वतःची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उपस्थित राहावं लागतं. त्यानुसार १५ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात उपस्थित झाले होते. त्यांनी आपली साक्ष दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले - २०१४ विधानसभा निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपावल्याच्या आरोपावर उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर झाले होते. या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयानं फडणवीसांना आपलं काय मत आहे असं विचारलं असता त्यांनी आरोप फेटाळून लावले. राजकीय वैमनस्यानं प्रेरित आरोप करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.