नागपुर: नागपुर शहरात गेल्या वर्षी डेंग्यूने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. जुलै 2021 सुमारे शंभरपेक्षा अधिक जणांना डेंग्युची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर यंदा अगोदरपासून खबरदारी म्हणून सर्वेक्षण सुरवात करण्यात आली आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यात आतापर्यंत शहरातील 3917 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधित घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात त्याच परिसरात सर्वेक्षण करून उपाययोजना सुचवल्या जात आहेत.
झोननिहाय पथकाद्वारे 3917 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 94 घरे ही दुषित आढळली आहे. त्या घरात डेंग्यु आढळून आली असून 04 जणांना ताप असल्याचे रुग्ण आढळून आले. मनपाच्या घरोघरीं सर्वेक्षण दरम्यान २९ कुलर्स रिकामी करण्यात आले. 322 कुलर्समध्ये 1 टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर 948 कुलर्समध्ये 2 टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच 45 कुलर्समध्ये गप्पी मासे सोडत प्राथमिक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाने केले आहे.