नागपूर -पीएचडी प्रवेशाकरता आवश्यक असलेली पूर्व परीक्षा 'पेट' ही दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून यंदा नोव्हेंबर संपत आला तरी अद्यापही या परीक्षेबाबत कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे पीएचडी करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. शिवाय यंदा विद्यापीठाकडून पेट- १ हाच पेपर घेण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतही अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतेही दिशानिर्देश जारी करण्यात आले नाही. त्यामुळे यावर्षी 'पेट'चा मुहूर्त कधी ठरणार असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
'पेट'चा मुहूर्त कधी ठरणार? विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण - Nagpur Latest News
पीएचडी प्रवेशाकरता आवश्यक असलेली पूर्व परीक्षा 'पेट' ही दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून यंदा नोव्हेंबर संपत आला तरी अद्यापही या परीक्षेबाबत कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे पीएचडी करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यानंतर अंतिम वर्षांच्या परीक्षा झाल्या, मात्र या परीक्षांमध्ये देखील प्रचंड गोंधळ झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा असाच गोंधळ पीएचडीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'पेट'साठी देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये 'पेट' होऊन निकाल हाती येत असतात, मात्र यंदा अद्यापही 'पेट'ची तारीख जाहीर झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. दरवर्षी नागपूर विद्यापीठाकडून पेट-१ व २ असे दोन पेपर घेतल्या जात होते. परंतु यावर्षी पासून पीएचडी पूर्व परीक्षेसाठी फक्त पेट-१ हाच पेपर घेतल्या जाणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी विशेष समिती देखील विद्यापीठाकडून गठीत करण्यात आली होती. मात्र अद्यापही 'पेट'ची तारीख जाहीर झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोधंळ निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या गलथान काराभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, तातडीने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.