दीपक केसरकर यांची संजय राऊत यांच्यावरील प्रतिक्रिया नागपूर Deepak Kesarkar On Sanjay Raut :आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन सध्या शिवसेनेतील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर बोलत असताना बुधवारी (13 डिसेंबर) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, 'शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल', अशी टीका केली होती. यावरच आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले दीपक केसरकर :यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना दीपक केसरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मिटिंग मी घडवून आणली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी यासंदर्भातील सर्व माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली, असं झालं नसतं तर आज उद्धव ठाकरे आणि मोदी एकत्र असते. संजय राऊतांनी शिवसेनेचं किती नुकसान केलंंय हे मी जाणतो. कार्यकर्त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे.
राणे विरुद्ध केसरकर वादातून राऊतांचं अस्तित्व :केसरकरपुढं म्हणाले की, मी ज्यावेळी शिवसेनेत नव्हतो तेव्हा नारायण राणे यांची कोकणात भक्कम पकड होती. संजय राऊत यांना त्यावेळी राहायला हॉटेलची रूम देखील मिळत नव्हती. त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला कोणी नव्हतं. तेव्हा माझा राणे यांच्यासोबत झालेला वाद तात्विक होता. त्या वादातून राऊतांचं अस्तित्व निर्माण झालंय.
अनिल परब यांच्या टीकेलाही दिलं उत्तर :आमदार (ठाकरे गट) अनिल परब यांनी देखील दीपक केसरकर यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देत केसरकर म्हणाले की, आमदार अपात्रतेच्या विषयावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली सुनावणी ही न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामध्ये जे जे घडतं ते रेकॉर्ड असतं. त्यामुळं त्याबद्दल कोणीही खोटं वृत्त देऊ शकत नाही. अनिल परब यांनी खोटं स्टेटमेंट दिलंय, मी न बोललेले शब्द त्यांनी माझ्या तोंडी घातलेत. यासंदर्भातील पत्र मी विधानसभा अध्यक्षांना देणार आहे. तिथून न्याय नाही मिळाला तर सर्वोच्च न्यायलयात जाईन. ज्या बाळासाहेबांचा मला आदर आहे, त्यांच्याबद्दल मी उलट-सुलट बोललो असं म्हणणं मी कधीच खपवून घेणार नाही, असंही केसरकर म्हणाले.
काय म्हणाले होते अनिल परब :सुनावणीदरम्यान उलटतपासणीवेळी दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांविषयी काढलेले उद्गार अतिशय संतापजनक होते. त्याचं कारण असं की, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असं सांगून त्यांनी गद्दारी केली आहे. मात्र आता ते असं म्हणत आहेत की, बाळासाहेबांनी लोकशाहीची कोणतीही तत्त्वे कधीही पाळली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे आरोप केसरकरांनी उलटतपासणीवेळी केले आहेत', असा आरोप अनिल परब यांनी केलाय.
हेही वाचा -
- Sunil Kawale Suicide Case : आत्महत्याग्रस्त सुनील कावळे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत; मंत्री दीपक केसरकरांची माहिती
- जरांगेंनी उपोषणातून जे कमावलं ते भाषणातून गमावू नये - दीपक केसरकर
- Deepak Kesarkar Reaction: शिंदे गटाच्या 'त्या' वादग्रस्त जाहिरातीवर मंत्री दीपक केसरकर म्हणाले...