नागपूर :दीक्षाभूमी ते लेह लद्दाख धम्म पदयात्रेला नागपुरातून सुरूवात झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पासह बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आली आहे. थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथीसह १० भंतेंच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करुन या धम्म पदयात्रेला प्रारंभ झाला. ही पदयात्रा 15 जुलैला लेह लद्दाखला पोहचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
जातीयवाद संपवण्यासाठी बुद्धांचा मार्ग स्वीकारावा लागेल :बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १०० अनुयायांना थायलंड पद्धतीने श्रामणेर दीक्षा देण्यात आली. थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी यांनी सर्वांना श्रामणेर दीक्षा, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. यावेळी बोलताना भन्ते पहरा थेपारीया तीसुथी यांनी जगात फार अशांतता निर्माण झाली आहे. आपापसातील वैर वाढले आहे. द्वेष, मत्सरासह जातीयवाद वाढला आहे. यातून मुक्ती जर हवी असेल तर बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.
भारतात तथागतांचे धम्मचक्र दिसत नाही :तथागत भगवान बुद्ध भारतात जन्माला आले, मात्र त्यांचा धम्म विदेशातच मोठा प्रमाणात भरभराटीस आला. भारतात बुद्ध धम्म आणि तथागतांचे धम्मचक्र कुठेच दिसत नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांचा समता, बंधुता आणि शांतीचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. त्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने ही धम्म पदयात्रा आयोजित करण्यात आल्याची माहितीीह यावेळी देण्यात आली.