नागपूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे बंद केली जात आहेत. राज्यात सुद्धा महत्वाची धार्मिक स्थळे पुढील काही दिवसांकरता बंद करण्यात आली आहेत. बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले नागपूरातील दीक्षाभूमी देखील शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पवित्र दीक्षाभूमीवर भारतातील नाही तर जगभरातून बौद्ध अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहत इतर धार्मिक स्थळांप्रमाणे दीक्षाभूमीसुद्धा सर्वांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत दीक्षाभूमी बंद ठेवण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतल्याची माहिती विलास गजघाटे यांनी दिली आहे.