Devendra Fadnavis on Karnataka Result : कर्नाटक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रावर... - कर्नाटक निवडणूक निकाल प्रतिक्रिया
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. आता या निकालावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचे विश्लेषण केले आहे.
अब्दुल समद
By
Published : May 13, 2023, 4:44 PM IST
नागपूर :कर्नाटक विधानसभा निवडणुकींच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकातील निकालाचा देशातील आणि राज्यातील निवडणुकांवर कुठलाही प्रभाव पडणार नाही, असे ते म्हणाले.
'जेडीएसची मते कॉंग्रेसला मिळाली' :पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात 1985 पासून कुठलेच सरकार पुन्हा सत्तेवर आले नाही. यावेळी आम्ही तो ट्रेंड मोडू असा आम्हाला विश्वास होता, मात्र ते शक्य झाले नाही. ते म्हणाले की, 2018 मध्ये आम्हाला 36 टक्के मतं मिळाली होती, यावेळी आम्हाला 35.6 टक्के मतं मिळाली आहेत. आमची फक्त अर्धा टक्के मतं कमी झाली, मात्र आमच्या जवळपास 40 सीट कमी आल्या आहेत. 2018 मध्ये जेडीएसला 18 टक्के मतं मिळाली होती. यावेळी त्यांची जवळपास 5 टक्के मतं कमी झाली आणि ही मते कॉंग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला हा विजय मिळाला आहे. भाजपची मते कुठेही कमी झाली नाही.
'कर्नाटकाचा परिणाम राज्यावर होणार नाही' : फडणवीस पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या स्थानिक निवडणुकांमध्ये आज भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय मिळवला आहे. कर्नाटकात जे काही झाले त्याचा कुठलाही परिणाम देशातील आणि राज्यातील निवडणुकांमध्ये होणार नाही. देशामध्ये मोदी सरकार आणि महाराष्ट्रात भाजपा - सेना युतीचेच सरकार येणार, असे ते म्हणाले. शरद पवारांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, शरद पवारांनी कर्नाटकात जागा लढवल्या मात्र त्यांना तेथे एक टक्काही मतं मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची काही गरज नाही.