नागपूर - शनिवार रविवार दोन दिवस बाजरापेठा, शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. विकेंड लॉकडाऊन असताना रस्त्यावर गर्दी पाहयला मिळत आहे. यामुळे शनिवारी बंदला काही नागरिकांनी खो दिल्याचे दिसून आले. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनीही शहरातील विविध भागात फिरून आढावा घेतला. दरम्यान लॉकडाऊन असतानाही नागरिक रस्त्यांवर गर्दी करत असल्याचे ते म्हणाले. या विकेंड बंदला व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवत सहकार्य केले, मात्र दुकाने आणि बाजारपेठा बंद असतानाही नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली.
नागरिकांची रस्त्यांवर गर्दी बाहेरून येणाऱ्या बसेसची तपासणी करणार
शहरात रोज चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. दररोज सरासरी हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद शहरामध्ये होत आहे. यासाठी बसमध्ये होणारी गर्दी कारणीभूत असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हटले आहे. यामुळे आता मनपा प्रशासनाने बसेसची पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास बसवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पूर्वी एकाच भागात अधिक रुग्ण आढळून येत होते. सुरुवातीला अस्वच्छता असलेल्या किंवा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून यायचे, मात्र आता हे रुग्ण शहराच्या सर्व भागात विखुरलेल्या अवस्थेत आढळत असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भा रोखण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
कोरोना रुग्ण आढळल्यास त्यावर योग्य उपचार करणारी यंत्रणा मनपा प्रशासनाकडे आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी पूर्ण तय्यारी आहे. पण वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी वयक्तीक अनुशासनाची गरज आहे. नागरिकांनीही त्रिसूत्रीचे पालन करावे, अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील यावेळी महापौरांनी केले आहे.