नागपूर -क्राईम सिटी असलेल्या नागपूरसाठी जून महिना फारच जड गेल्याचे आकडे पुढे आले आहेत. नागपूर शहर आणि जिल्ह्यात जून महिन्याच्या ३० दिवसांमध्ये तब्बल 18 लोकांचा खून झाला आहे. यापैकी 9 घटना नागपूर शहरात घडल्या. ज्यामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर ग्रामीणमध्येही 5 खुनाच्या घटनांची नोंद आहे. ज्यात 4 व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गंभीर बाब म्हणजे यापैकी काही घटना टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शो बघून घडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. नागपूर पोलीस विभागाकडून गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अनके घटना कौटुंबिक कलहातूनही घडल्या आहेत.
15 वर्षीय मुलाच्या हत्याकांडापासून हत्यासत्र सुरू -
नागपूरच्या गुन्हेगारी विश्वाचा इतिहास बघितला तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, की उपराजधानीत खुनाचे सत्र सुरू झाल्यानंतर लागोपाट खुनी घटना घडत असतात. हा क्रम गेल्या काही वर्षांपासून असाच सुरू आहे. एकदा खुनाच्या घटना घडायला सुरवात झाली, तर त्या लवकर थांबत नाहीत. जून महिन्यातसुद्धा नागपूरकरांना याचा अनुभव आला आहे. जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात तब्बल १४ खुनाच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये 18 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना देखील समाविष्ट आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या अपहरण व हत्याकांडापासून हत्यासत्र सुरु झाले.
क्राईम शो पाहून घडलेल्या घटना :-
15 वर्षीय मुलाची अपहरणानंतर हत्या
१२ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय राज पांडे या विद्यार्थ्याचे अपहरण झाले. त्याच्याच परिचित असलेल्या सुरज रामभुज शाहू या आरोपीने अपहरण करून राजचा खून केला. मृत राजच्या काकांसोबत असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने राजचे अपहरण करून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपीने इंटरनेटवर अनेक क्राईम शो बघितल्यानंतर षडयंत्र रचले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या
२२ जून रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आलोक माटूरकरने मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून स्वतःच्या कुटुंबातील 5 जणांची हत्या केली. यात त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, साळी आणि सासूचा समावेश आहे. ती रात्र रक्तरंजित केल्यानंतर आरोपी आलोकनेसुद्धा आत्महत्या केली होती. धक्कादायक म्हणजे घरातील 5 लोकांना रक्तात लोळवण्यापूर्वी आरोपी गेल्या काही दिवसांपासून टीव्ही आणि इंटरनेटवर क्राईम शो बघत होता. त्यातूनच प्रेरित झाल्यानंतर आरोपीने इतके मोठे हत्याकांड घडवल्याची माहिती पोलिसांच्या तपासात हाती लागली आहे. दरम्यान, विजया माटूरकर (पत्नी), बिंटी माटूरकर (मुलगी), साहिल माटूरकर (मुलगा), लक्ष्मी बोबडे (सासू) आणि अमिषा बोबडे (मेहुणी) अशी आलोकने हत्या केलेल्यांची नावे आहेत.