नागपूर -जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. मंगळवारी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात जिल्ह्यामध्ये नवे २ हजार २०५ रुग्ण आढळून आले. आजघडीपर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. या नव्या रुग्णांसह नागपुरातील बाधितांची संख्या ४३ हजार २५७ इतकी झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात नागपुरात २४ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र या महिन्याच्या आठच दिवसांमध्ये तब्बल १३ हजार ७०२ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता या महिन्यात तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या २ हजार २०५ रुग्णांपैकी ३४९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर १ हजार ८५४ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. सुखद बाब म्हणजे, मंगळवारी १ हजार ८०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यासह नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ४६१ इतकी झाली आहे.