नागपूर - मागील काही दिवसांपासून पोलीस विभागात कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरण समोर आली. यात दिवसागणिक वाढ होताना पाहायला मिळत आहे. यामुळे खास पोलिसांसाठी 'फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांना रस्त्यांवर गर्दी करण्यास रोखण्यासाठी, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये देखील पोलीस तैनात आहेत. नागपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना, मागील आठ दिवसांमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नागपूर पोलीस आयुक्तांनी, खास पोलिसांसाठी फिव्हर क्लिनिक सुरू केले आहे.
नागपूरच्या प्रत्येक चौकात आणि प्रतिबंधित भागात पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. यात चौकशीसाठी त्यांचा काहीसा संबंध नागरिकांशी येतो. यामुळे अनेक पोलिसांच्या मनात कोरोनाच्या भीतीने घर केले आहे. पोलिसांच्या मनातील ही भीती दूर व्हावी, या उद्देशाने फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.