महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोव्हॅक्सीन' लसीच्या मानवी चाचण्यांना नागपुरातील गिल्लूरकर रुग्णालयात सुरुवात - गिल्लूरकर हॉस्पिटल कोव्हॅक्सीन चाचणी

'कोव्हॅक्सीन' या लसीच्या मानवी चाचणीसाठी देशात १२ सेंटरची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात केवळ नागपूर हे एकमेव सेंटर देण्यात आले आहे. नागपुरातील गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली असून काल तीन जणांना ही लस देण्यात आली.

Covaxin
कोव्हॅक्सीन

By

Published : Jul 28, 2020, 5:01 PM IST

नागपूर - भारतात तयार होत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक 'कोव्हॅक्सीन' या लसीच्या मानवी चाचण्यांना देशभरात विविध ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. नागपुरातील गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. काल तीन जणांना ही लस देण्यात आली. ही लस दिलेल्या तीनही व्यक्तींना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. पुढील १४ दिवसापर्यंत कोरोनाची लक्षणे किंवा त्रास न जाणवल्यास त्यांना कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

'कोव्हॅक्सीन' लसीच्या मानवी चाचण्यांना नागपुरातील गिल्लूरकर रुग्णालयात सुरुवात

कोरोना लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपुरातील 'कोव्हॅक्सीन वारीयर्स' स्वतः पुढे येत आहेत. काल तिघांना लस दिल्यानंतर आज आणखी चार जणांवर लसीची चाचणी करण्यात आली. नागपूरात पहिल्या टप्प्यात 30 ते 40 जणांवर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली.

भारतीय औषध नियामक महामंडळा(डीसीजीआय)ने 'कोव्हॅक्सिन' नावाच्या लसीची मानवी चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. ही लस तयार करण्याच्या प्रकल्पात हैदराबादस्थित भारत बायोटेक, पुण्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्था सहभागी आहेत. या लसीच्या मानवी चाचणीसाठी देशात १२ सेंटरची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात केवळ नागपूर हे एकमेव सेंटर देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एम्स दिल्ली, एम्स पाटणा, निझामुद्दीन इन्स्टिट्यूट हैदराबाद आणि पीजीआय रोहतक येथे चाचणी झाली होती. आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून यामध्ये नागपूरातील गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह आणखी 4 संस्था सहभागी झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details