नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप करत अॅड सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज ४ डिसेंबरला प्रथम श्रेणी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. यापूर्वीही फडणवीसांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेली याचिका प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१९ मध्ये प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाने १ नोव्हेंबरला उके यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणीस सुरुवात केली. त्यानंतर नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार आज या प्रकरणावर सुनावणी झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.