नागपूर-देशात आणि राज्यात शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान होताच एकच प्रश्न ऐरणीवर आला आहे तो म्हणजे फ्रंट लायनर वॉरिअर्स असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेचा विचार करण्यासाठी कुणाकडे वेळ आहे का? केवळ एक मास्क तोंडाला बांधून कर्तव्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या पोलिसांना देखील डॉक्टरांप्रमाणे पीपीई किट मिळावी, अशी मागणी करताना देखील कुणीही पुढाकार घेत नसल्याचे दिसत आहे.
कोरोना विषाणूविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत पोलीस हे सर्वात महत्वाचे योद्धे आहेत. त्यांच्या धाकानेच आज कोट्यावधी नागरिक घरात बसलेले आहेत आणि जे बेजबाबदार नागरिक बाहेर पडतात त्यांना वठणीवर आणण्याचे काम देखील पोलिसच करत असल्याने या पोलिसांना संपूर्ण सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. सुदैवाने अद्याप नागपुरातील एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही.तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून वयाची 50 गाठलेल्या कर्मचाऱ्यांना आणि मधुमेह,किव्हा इतर गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कटेंन्टमेन्ट झोन पासून दूर ठेवण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूंसोबत सुरू असलेल्या लढाईत डॉक्टर,नर्सेस स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस हे फ्रंट लायनर वॉरिअर्स असल्याचे गौरवाने सांगितले जात आहे आणि ते खरं देखील आहे. कोरोना विषाणूचा हल्ला परतवून लावण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट हवी आहे. मात्र, गेल्या 40 दिवसांपासून दिवस, रात्र कोणत्याही संकटांची पर्वा न करता तुमच्या आमच्या रक्षणासाठी रस्त्यांवर, गल्लीबोळात दवाखान्यात आणि कंटेन्टमेंट झोन मध्ये तैनात असलेल्या त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच काय, या काळजाला भिडणाऱ्या प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही, असे दिसते.