नागपूर - विदेशात सापडलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नागपुरात इंग्लंडवरून आलेला 28 वर्षीय तरुण हा नवीन स्ट्रेनचा संशयित असल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, नवीन स्ट्रेनचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे की नाही, हे कळायला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचा अहबाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी माध्यमांना दिली.
'त्या' संशयिताचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, पण स्ट्रेनचा अहवाल प्रतीक्षेत - इंग्लंड वरून आलेल्या तरुणाचा कोरोना अहवाल
विदेशातून नागपुरात आलेल्या तरुणाचा कोरोना अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला आहे. मात्र नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे अद्यापही नव्या स्ट्रेन बाबत भीती कायम आहे.
पुण्याला पाठवला स्वॅब-
दरम्यान, याच काळात बाहेर देशात नवीन स्ट्रेनचा धोका निर्माण होऊ लागला आहे. तसेच हा तरुण ही इंग्लंडवरून परत आला असल्याचे सांगितले. यामुळे खबरदारी म्हणून या रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आला आहे. त्यानंतर या तरुणाची पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, पुण्यातील व्हायरोलॉजी इन्स्टीट्यूटचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने त्या तरुणाला अद्यापही नागपूर मेडिकल कॉलेजच्या वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील 48 तासात अहवाल येणे अपेक्षित असल्याची माहितीही अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी पत्रकारांना दिली.