नागपूर - आज दिवसभरामध्ये नागपुरात १५ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागपूरने कोरोना रुग्ण संख्येचा सातशेचा टप्पा पार केला आहे. सध्या नागपुरात कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ७०७ झाली आहे. तर आज नऊ कोरोनाबाधित रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या ४७० इतकी झाली आहे. तर १३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला सातशेचा टप्पा - नागपूर कोरोना अपडेट
नागपूरला सहाशे रुग्णांचा टप्पा गाठायला ८४ दिवस लागले होते, मात्र पुढील चारच दिवसात शंभर पेक्षा जास्त रुग्ण वाढल्याने नागपुरात एकूण रुग्ण संख्या ७०७ इतकी झाली आहे.
सध्या नागपुरात २२४ रुग्णांवर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपुरात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला होता, त्यानंतर ८८ दिवसात सातशे रुग्ण पूर्ण झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरला सहाशे रुग्णांचा टप्पा गाठायला ८४ दिवस लागले होते, मात्र पुढील चारच दिवसात शंभर पेक्षा जास्त रुग्ण वाढल्याने नागपुरात एकूण रुग्ण संख्या ७०७ इतकी झाली आहे. १५ दिवसांपूर्वी नागपूर कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 80 पर्यंत गेली होती, मात्र गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्ण पुढे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाण कमी झाल्याने सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ६६ टक्के झाली आहे.