नागपूर- उपराजधानी नागपुरात कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. दररोज साडेतीन हजारांपेक्षा जास्त नागरिक कोरोनाबाधित होत असल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयाच्या कोविड कक्षातील खाटा फुल्ल झाल्या आहेत. सध्या नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना खाटा मिळत नसल्याची भीषण परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निवासासह अनेक ठिकाणी पुन्हा नव्याने कोरोना केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या नागपूर शहरात शासकीय आणि काही खासगी रुग्णालयात ७०८ ऑक्सिजन असलेल्या खाटा उपलब्ध असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे.
नागपुरात रुग्णांसाठी खाटा पडतायत कमी; कोरोना केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली - नागपूर कोरोना घडामोडी
सध्या नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना खाटा मिळत नसल्याची भीषण परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निवासासह अनेक ठिकाणी पुन्हा नव्याने कोरोना केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यात आणि शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या प्रयत्नांना कुठलेही यश अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. 22 मार्च रोजी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ नये, या करिता खासगी रुग्णालये कोरोना रुग्णालयात बदलण्याचे सुरू करण्यासंदर्भात हालचालींना वेग आलेला आहे. सध्या शहरात मेयो, मेडिकल एम्ससह अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, रुग्णसंख्या लक्षात घेता वर्तमान व्यवस्था अपुरी पडणार आहे.
तत्काळ १ हजार खटांची व्यवस्था करा - महापौर
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे तत्काळ १ हजार अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या तीस हजारांच्या वर गेल्यानंतर आता प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये शहरातील इतर रुग्णालये कोरोना रुग्णालये म्हणून सुरू करण्याकरिता परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.