नागपूर -राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोना रुग्ण संख्येचा पुन्हा उद्रेक झाला आहे. आज(शुक्रवार) दिवसभरात १ हजार ३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना 'आउट ऑफ कंट्रोल' झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यापैकी मागील ३० दिवसांमध्ये सुमारे ११ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्या तुलनेत नागपुरात रुग्ण कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण ८० वरून ४४ टक्क्यांवर आले आहे.
आज नागपुरात १ हजार ३६ नवीन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली. धक्कादायक म्हणजे गेल्या आठ दिवसांमध्ये नागपूर शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येचा उद्रेक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या आठ दिवसात नागपुरात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२ हजार ७४५ इतकी झाली आहे. यामध्ये २३९ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत.
एकूण रुग्ण संख्येपैकी ३३३४ रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत तर ९१११ रुग्ण नागपूर शहरातील आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी १६९ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर ८६७ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. तर आज १२३ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५ हजार ६३९ इतकी झाली आहे. या शिवाय आज २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे नागपूरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ४४७ इतका झाला आहे. महत्वाचे म्हणजे ४४७ पैकी ३८९ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर ५८ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
सध्या नागपुरातील २८ ठिकाणी ६ हजार ६५९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २ हजार ५८३ रुग्ण गृह विलागीकरणात आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४४.२४ टक्के इतके आहे. एकूण मृत्यू दर हा ३.५० इतका आहे. शिवाय मूळ नागपूरातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी ३.०५ इतकी आहे.