नागपूर- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. दररोज सरासरी 2 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात 66 खासगी रुग्णालय आणि 7 शासकीय रुग्णालयातून कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू तसेच व्हेंटिलेटर असे 1745 बेड आजच्या घडीला उपलब्ध आहेत. यामध्ये मंगळवारपर्यंत 19 हजार कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली.
नागपूर जिल्ह्यात काही आठवड्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे झपाट्याने वाढत आहे. यावर नागरिकांना योग्य उपचार मिळावा यासाठी मनपाच्या वतीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षातून कोरोना संदर्भात भरती करण्यासाठी उपलब्ध बेडची माहिती कुटुंबीयांना देण्याची सोय केली आहे. मागील काही दिवसात कोरोना बधितांचा संसर्ग हा अधिक गतीने वाढत आहे. यामुळे अधिकाअधिक नागरिकांची कोरोना चाचणीच्या माध्यमातून रुग्ण शोधून संसर्ग साखळी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कंटेन्मेंट झोन निर्मितीला सुरुवात-रुग्ण मिळत असताना बहुतांश पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये फारसे लक्षणे दिसून येत नाही आहे. यामुळे असे लोक हे सहज गर्दीत वावरत असून या लोकांपासून इतरांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी दाटीच्या वस्तीत असणारा कोरोना हा आता उंच इमारती खासकरून फ्लॅट सिस्टीम मध्ये प्रवेशित झाला आहे. यामुळे एका इमारतीत 5 पेक्षा जास्त रुग्ण मिळून आल्यास इमारत सील करून टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. या सोबतच घरांच्या एका ओळीत 20 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आल्यास त्या भागाला कंटमेंट झोन घोषित करत उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासन सज्ज भीतीपोटी चाचण्यापासून अनेकजण दूरच नागरिकांना विलगीकरणात राहण्याची भीती पोटी काही नागरीक अद्यापही कोरोनाची लक्षणे असतानाही चाचणी करून घेत नाहीत. असे रुग्ण इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोना प्रसार वेगाने होऊन रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून रोज 10 ते 11 हजार नागरिकांची चाचणी केली जात आहे.
सीसीसी सेंटरवर विलगिकरणाची सोय-
नागपुरात मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या चाचणीत काही रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांच्यामध्ये कोरोना सदृश लक्षणे दिसून येत नसल्याचे ही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना देखील विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाकडून सीसीसी सेंटरचा वापर केला जात आहे. यात खासकरून लक्षणे नसतांना आणि घरात विलगिकरणाची सोय नसणाऱ्यांना ठेवले जात आहे. यात त्यांना जेवणासहा इतर आवश्यक सुविधा दिल्या जात आहे. यामध्ये पाचपावली येथील आरोग्य केंद्रात 150 बेड तर व्हिएनआयटी येथे 60 बेडची सोय आहे.
कोरोना रुग्णासाठी किती बेडचे नियोजन...
नागपूर शहरात 66 खासगी रुग्णलाय हे कोविड हॉस्पिटल म्हणून सेवेत आहेत. या रुग्णालयात लहान आणि मोठे अशा रुग्णालयांचा समावेश असून शहरातील विविध भागात सेवा उपलब्ध आहे. यात रुग्णालयाच्या कमी अधिक क्षमतेनुसार 717 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. 285 आयसीयू बेड तर 93 व्हेंटिलेटर बेड सेवेत आहेत. तेच 7 शासकीय रुग्णालयांमध्ये 450 बेड हे अशा रुग्णांसाठी ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. 102 बेड हे अतिदक्षता विभागात राखीव आहे. कृत्रिम पद्धतीने श्वास देण्याची गरज भासल्यास 101 व्हेंटिलेटर बेड राखीव ठेवण्यात आले आहे.
नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये 1000 बेडचे असणार नियोजन-
शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात आताच्या घडीला 200 च्या घरात रुग्ण दाखल आहेत. या ठिकाणी 600 रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. येत्या काळात येथील बेडची संख्या 1 हजार पर्यंत करण्याचे नियोजन आहे. यात 250 बेड हे आयसीयूचे असणार असून 750 बेड हे ऑक्सिजनची सोय असणार असे नियोजन असल्याची माहिती नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ईटीव्हीला दिली आहे.
अशी आहे रुग्णांची परिस्थिती-
मंगळवारी साधारण 19 हजार रुग्ण हे अॅक्टिव्ह असून यात अडीच हजारच्या घरात रुग्ण ऑक्सिजनवर बेडवर उपचार घेत आहेत. यात 104 हे शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात तर 205 हे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात आहे. यात जवळपास 350 रुग्ण हे सीसीसी सेंटरला दाखल आहे. यासहा इतर 16 हजारच्या घरात रुग्ण हे विलगीकरणासह किरकोळ लक्षणे असल्याने उपचार घेत आहेत.