नागपूर :नागपुरच्या हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्यासह दोघांना एक कोटी 59 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ट्रस्टचे विद्यमान सचिव ताज अहमद अली यांच्या तक्रारीवरून सक्करदारा पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईमुळे ताजबाग ट्रस्टचे संबंधित लोकांचे धाबे दणाणले आहे.
ट्रस्टचा निधी स्वतःच्या खात्यात वळवला :जानेवारी 2011 ते डिसेंबर 2016 या पाच वर्षांच्या कालावधीत काँग्रेस नेते शेख हुसेन हे ट्रस्टचे अध्यक्ष तर इकबाल वेलजी सचिव होते. ट्रस्टला भाविक आणि विविध स्त्रोतांकडून जे उत्पन्न मिळाले, त्यापैकी हुसेन यांनी एक कोटी 48 लाख तर वेलजी याने अकरा लाख 52 हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम जमा करण्यापूर्वी ट्रस्ट किंवा धर्मदाय आयुक्तांची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही.