नागपूर : सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावमधील जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले. यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींनी त्यांचे विचार मांडले आहेत, उद्धव ठाकरे हे स्वतःचे विचार मांडत आहेत. यामुळे ते दोघेही स्वतःच्या पक्षाचे विचार घेऊन पुढे जात आहेत. ज्याप्रकारे भारतीय जनता पार्टी राहुल गांधी यांच्या माफीची मागणी करत आहेत, त्यावरून राहुल गांधी यांनी सावरकरांच्या संदर्भात आपले विचार मांडले आहेत.
कॉंग्रेसचे मोठे योगदान : तीनही पक्ष विपरीत परिस्थितीत एकत्र आले. पहाटेच्या सरकारनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. काँग्रेसचा विचार लहान आहे असे मानू नये, सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन चाललो आहे. भारत देशाच्या इतिहासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. गेल्या 8 ते 10 वर्षात देशाची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे.
लोकमान्य टिळकांचा दाखला : नाना पटोले पुढे म्हणाले की, मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही अशी भूमिका लोकमान्य टिळकांनी घेतली होती. त्याचप्रमाणे चोराला चोर म्हटले तर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका देखील राहुल गांधी यांनी घेतली. यामध्ये काहीही चुकीचे नाही.
विचारांशी तडजोड नाही :महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा कॉमन मिनीमम प्रोग्राम निश्चित झाला होता. त्यात सावरकर हा विषयच नव्हता. सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहे. काँग्रेसने विचारांशी तडजोड केली नाही, करणार नाही. सत्ता येतील जातील, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
बावकुळेंचे ठाकरेंना आव्हान :उद्धव ठाकरेंच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना 50 वेळा काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगले. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरेंमध्ये जर धमक असेल तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे. काँग्रेस पक्षाची साथ सोडण्याचे जाहीर केल्यास संपूर्ण महाराष्ट्र तुमचे अभिनंदन करेल, मी सुद्धा उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करेल.
ठाकरे मागच्या दारातून विधानपरिषदेत :बावनकुळे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे कधी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढले नाहीत. मागच्या दारावरून विधानपरिषदेत गेलेले उद्धव ठाकरे हे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात. ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही. त्यांनी निवडणुकीच्या गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा आम्ही विधानसभेतील 200 जागा जिंकून येऊ.
बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे : उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करत असतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे ज्या कुळाला उंची दिली होती नेमका तोच तुम्ही बुडविला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचच नाव बुडवत आहात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा. काँग्रेस पक्षाची साथ सोडा. ते रोज सावरकरांचा अपमान करतात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा आणि बाहेर पडा. फक्त सभेतूनच वल्गना करू नका, असा घणाघात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर चढवला.
हेही वाचा : Uddhav Thackeray Malegaon : सावरकर आमचे दैवत, उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले; शिंदेंवरही डागली तोफ