नागपूर - नागपूर गुन्हे शाखेने काँग्रेस नेत्याला खंडणी प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. त्रिशरण सहारे असे या काँग्रेसच्या नेत्याचे नाव असून, तो भोसले राजघराण्याशी संबंधीत लोकांना धमकावून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात होता. या संदर्भात भोसले कुटुंबीयांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. त्रिशरण सहारे हा एकेकाळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा खास विश्वासू असल्याचेही समोर आले आहे. राजघराण्याला ब्लॅकमेल करण्याचे हे प्रकरण पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतले. राजघराण्याच्या लोकांना ब्लॅकमेल करण्याच्या या प्रकरणावर सध्या काँग्रेस पक्षाने मौन साधले आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
खंडणी वसूलीच्या प्रकरणात काँग्रेस नेत्याला अटक अर्धवट व्यवहाराचे बँक ट्रांजेक्शन पोलिसांच्या लक्षात आले
काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड रणजित सफेलकर याला अटक झाल्यानंतर पोलिसांनी सफेलकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आर्थिक व्यवहार तपासले, तेव्हा नागपूरचे संस्थानिक असलेल्या भोसले राजघराण्यातील काहींचे नाव पुढे आले. यामध्ये त्रिशरण सहारे हा भोसले राजघराण्यातील काहींना धमकावून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्न होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या उमरेड तालुक्यात भोसले राजघराण्याची वडिलोपार्जित जमीन असून, काही वर्षांपूर्वी नागपूरचा कुख्यात गुंड रणजित सफेलकरशी संबंधित काही लोकांनी ती जमीन खरेदी करण्यासाठी राजघराण्यातील काही लोकांशी सौदा केला होता. ठरलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा ही करण्यात आली होती. मात्र, पुढे तो सौदा पूर्ण होऊ शकला नाही. दोन महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनी रणजीत सफेलकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करत संपूर्ण टोळी गजाआड केली आहे. त्यानंतर रणजीत सफेलकर टोळीच्या जमीन खरेदी व्यवहारांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याच प्रक्रियेत अनेक वर्षांपूर्वी भोसले राजघराण्याशी सफेलकर टोळीतील काहींनी केलेल्या त्या अर्धवट व्यवहाराचे बँक ट्रांजेक्शन पोलिसांच्या लक्षात आले. यात कुख्यात गुंड सरणजित सफेलकरच्या बँक खात्यातून व्यवहार झाल्यामुळे पोलिसांनी भोसले राजघराण्यातील संबंधित लोकांना बोलावून, त्या अर्धवट राहिलेल्या जमीन व्यवहाराची माहिती घेतली.
ब्लॅकमेलिंगला बळी न पडल्याने झाला खुलासा
राजघराण्यातील लोकांना बोलावून पोलीस चौकशी करत आहेत. ही बाब काँग्रेसचा स्थानिक नेता त्रिशरण सहारेला माहित पडल्यानंतर त्याने त्याच माहितीचा फायदा घेण्याचे ठरवत राजघराण्यातील लोकांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. तुमची पोलीस चौकशी सुरू आहे. तुमचे कुख्यात गुंड रणजित सफेलकरसोबत व्यवहार आहेत. माझ्याकडे त्याचे काही पुरावे आहेत. ही सर्व माहिती पत्रकारांच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणीन विविध प्रसार माध्यमात आणेन अशी धमकी देऊन, त्रिशरण सहारे भोसले राजघराण्यातील नातू किरदत्त यांना चार लाख रुपये खंडणी मागू लागला. मात्र, आपली काहीही चूक नाही. जमिनीचा व्यवहार नियमाप्रमाणे करत होतो. तो व्यवहार ही पूर्ण झाला नाही. त्याची संपूर्ण माहिती ही पोलिसांना दिली आहे. त्यामुळे एका नेत्याच्या ब्लॅकमेलिंग ला बळी पडायचे नाही, असे ठरवत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी त्रिशरण सहारे याला दोन लाख रुपयांची खंडणी वसूल करताना रंगेहात अटक केली आहे