नागपूर - नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी माजी मंत्री दिवंगत गोविंदराव वंजारी यांचे चिरंजीव अभिजित वंजारी यांचे नाव काँग्रेसकडून निश्चित झाले आहे. तर, भारतीय जनता पक्षाने अद्यापही उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे, काँग्रेसचे अभिजित वंजारी विरुद्ध भाजपकडून कोण लढणार, याबाबत उत्सुकता वाढलेली आहे.
भाजपकडून विद्यमान आमदार प्राध्यापक अनिल सोले यांना संधी मिळणार, असा दावा भाजपचा एक गट करत आहे. मात्र, असे असले तरी, नागपूर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर संदीप जोशी यांचे नाव देखील चर्चेत असल्याने भाजपमध्येच चुरस वाढली आहे. त्यामुळे, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची घोषणा दिल्लीतून होण्याची दाट शक्यता आहे.
अभिजित वंजारी यांनी प्रचारात आघाडी
भाजपकडे इच्छुक उमेदवारांची फौज असल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेस पक्षाने उमेदवार काही महिन्यांपूर्वीच निवडला असल्याने अभिजित वंजारी यांनी अप्रत्यक्षरित्या प्रचाराला सुरवात देखील केलेली आहे. समाज माध्यमांच्या माध्यमातून अभिजित वंजारी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अद्याप उमेदवारी संदर्भांत भाजपकडून कोणत्याही इच्छुक उमेदवाराने जाहीररित्या इच्छा व्यक्त केली नसली, तरी महापौर संदीप जोशी यांनी मात्र पक्षाने जबाबदारी दिल्यास शंभर टक्के तयार असल्याचा दावा केला आहे.
भाजपचा उमेदवार कोणत्या गटाचा असेल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गटाचे समजले जाणारे माजी महापौर प्राध्यापक अनिल सोले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ते विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे विद्यमान महापौर संदीप जोशी यांच्या नावाने देखील जोर धरला आहे. दोन मोठ्या नेत्यांच्या समर्थकांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे निश्चित आहे.
पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड, ५० वर्षापासून कब्जा
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो. इथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस, पंडित बछराज व्यास, नितीन गडकरी आणि अनिल सोले या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यापैकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सलग तीन टर्म नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. त्यामुळे, ही जागा भाजपसाठी नेहमीच प्रतिष्ठेची मानली गेली आहे.
जातीचे गणित महत्वाचे
भारतीय जनता पक्षाकडून पुढे आलेले दोन्ही उमेदवार हे ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तर काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी हे तेली समाजातून येतात. नागपूर विभागात दोन्ही समाजाच्या मतांची संख्या मोठी आहे. मात्र, तेली समाजाची व्याप्ती मोठी आहे. त्यातही तेली मतदार हा भाजपच्या बाजूने असल्याचे गेल्या अनेक दशकांपासून पुढे आले आहे. त्यामुळे, जातीच्या गणिताचा फायदा नेमका कुणाला होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा-चकमकीत लष्कराचे ३ जवान आणि एका बीएसएफ सैनिकाला वीरमरण