नागपूर -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता भंग होऊ नये, म्हणून काँग्रेसने रॅली रद्द केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपाला मुद्दा मिळू नये, यासाठी काँग्रेसने रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
बाळासाहेब थोरातांनी दौरा केला रद्द -
पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. यावेळी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस नेते नागपुरात शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात होते. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातील तीन कायद्यांचा निषेध करणे हाही यामागचा एक हेतू होता. त्यासाठी जिल्ह्यातून तीनशे ट्रॅक्टर नागपूरात येणार होते. पोलिसांनी रॅलीला परवानगी देण्यासंदर्भात असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी परवानगी मिळवण्यासाठी धावपळही सुरू झाली होती. हा विषय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी आपला नागपूर दौरा रद्द केला. त्यामुळे अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. या संपूर्ण घटनाक्रमात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रकृती बिघडल्याने दौरा रद्द केल्याचे कारण देखील पुढे केले जात आहे.