नागपूर - मसाजच्या नावाखाली तरूणाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर. धनकट असे या तरूणाचे नाव आहे.
'परी'कडून करायला गेला मसाज; अनं... एका तरुणाने मसाजसाठी 'परी नाईट डॉट कॉम' या एस्कॉर्ट सर्व्हिसकडून बुकिंग केली. मात्र, तरुणीला बोलावण्याची हौस या ग्राहकाच्या अंगलट आली. तरुणाने मसाजसाठी मुलगी बोलविण्याकरिता गुगल पेवरून तरूणीच्या खात्यात पैसे पाठविले. मात्र, सायंकाळ होऊनदेखील तरुणी आली नाही. यानंतर या संतप्त ग्राहक तरूणाने थेट गिट्टीखदान पोलिसांत तक्रार केली. आर. धनकट नावाच्या या तरुणाने मसाज करण्यासाठी तरुणीला घरी बोलावले. त्याने मोबाईवरून 'परी नाईट डॉट कॉम' या एस्कॉर्ट सर्व्हिसवरून एका तरुणीचा फोटो निवडला आणि वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तिला फोन केला.
तिने तासाभरात येण्याचे सांगितले. बुकिंग चार्ज म्हणून 2 हजार रुपये अॅडव्हॉन्स मागितला. तरूणाने लगेच मोबाईल क्रमांकावरून तिच्या खात्यात 3 हजार रुपये पाठवले. मात्र, बराच वेळ होऊनही ती तरुणी आली नाही म्हणून त्याने तिच्या मोबाईलवर संपर्क केला. 'तू घरी आल्यावर माझ्याशी अश्लील चाळे करशील, ही भीती आहे. त्यामुळे तू रिस्क अमाउंट म्हणून आणखी दोन हजार रुपये गुगले पे कर', अशी मागणी तिने केली.
हेही वाचा -''हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता''...तारक मेहता विरुद्ध मनसे आक्रमक
यानंतर तरुणाने तिला घरी आल्यावर दोन हजार रुपये देण्याची कबुली दिली. तसेच अश्लील चाळे न करण्याचीही हमी दिली. मात्र, या तरूणाने तिला आणखी पैसे न दिल्यामुळे तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिला पैसे परत मागितले. तर तरुणीने पैसे परत करण्यास नकार दिला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तरुणाने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.