नागपूर- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी एक दिवसाच्या पूर्व विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर विमानतळावर पोहचल्यावर हेलिकॉप्टरने ते थेट भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची पाहणी करणार आहेत. गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी कालवा हा सिंदेवाही व मूलपर्यंत जाणार आहे. या कालव्याची मुख्यमंत्री ठाकरे पाहणी करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते राजीव टेकडी या पर्यटन स्थळालादेखील भेट देणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात आगमन होणार आहे. गोसेखुर्द धरणासंदर्भात आढावा घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या बाबतीत चर्चा व आवश्यक निधीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.