नागपूर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा उभारणार आहे. त्यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रूपये वाचणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही कोणत्याही प्रकारच्या कामाला स्थगिती दिली नाही. केवळ आम्ही कामांचा आढावा घेत आहोत. समृद्धी महामार्गासाठी राज्य शासन कर्जाच्या माध्यमातून पैसे उभारणार होते. त्या कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागणार होते. परंतु आता या महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून, यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रूपये वाचणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. हा प्रकल्प महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा असेल. तसेच समृद्धी महामार्गालगतच्या व्यवसायांमधून रोजगार निर्मिती करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र काम केले पाहिजे. तसेच कोणत्याही सिंचन प्रकल्पाला आपण स्थिगिती दिली नाही. सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेताना कालव्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच गोसेखुर्द प्रकल्पासाठी लागेल तेवढा पैसाही राज्य सरकार देईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय उभारले जाणार आहे. राज्यातील रस्ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच जून २०२३ पर्यंत रखडलेले सर्व प्रकल्प आम्ही पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०० रूपये अधिक देण्यात येतील. पूर्ण विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष निधीची घोषणाही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मदत करावी अशी विनंती केली. मोदी मंगोलियाला ४ लाख कोटी डॉलर देतात मग महाराष्ट्राला का देत नाहीत?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी हे जागतिक दर्जाचे नेते आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.