नागपूर: बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष तीव्र झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आहे. जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. राज्यात कुठलाही प्रकल्प लोकांवर अन्याय करून किंवा बळजबरीने प्रकल्प पुढे रेटण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन कारवाई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या वेळी सुद्धा सुरुवातीला लोकांकडून तीव्र विरोध करण्यात आला मात्र, त्यानंतर लोकांना समृद्धी मार्गाचे महत्व पटल्यानंतर लोकांनीचं स्वतःहून जमीनी देण्याची तयारी दर्शवली होती. त्याचप्रमाणे बारसू येथील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई केली जाईल. अनेकांनी जमीन देण्यास सकारात्मकता दर्शवली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. आत्ता केवळ सोईल टेस्टिंग सुरू झाली आहे. ती जागा प्रकल्प होण्यासाठी उपयुक्त आहे की, नाही हे देखील माहिती नाही. सोईल टेस्टिंग नंतर रिफायनरी प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी बरीच प्रक्रिया पूर्ण करावी लागते.