नागपूर - येथील निवडणूक तुम्ही सर्वजण सांभाळत आहात, त्यामुळे मी आता प्रचाराला येणार नाही, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. यावेळी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागपूरकरांना भावनिक आवाहन मी महाराष्ट्रात पक्षाच्या प्रचारासाठी जातो आणि असा रणकंदन निर्माण करतो की, भाजप मोठ्या प्रमाणात विजयी होईल आणि विरोधकांचा सुपडा साफ होईल. फक्त तुमचा आशीर्वाद द्या, अशा शब्दात फडणवीसांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांचा आशीर्वाद मागत त्यांचा निरोप घेतला. फडणवीस सध्या राज्यभर प्रचारात व्यस्त असून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या दक्षिण- पश्चिम नागपूर या मतदारसंघात फक्त दोनच सभा घेतल्या आहेत.
हेही वाचा -भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस; सुप्रिया सुळेंचा निशाणा
बुधवारी त्यांची दुसरी सभा पार पडली, तेव्हा मतदारांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केले. माझ्या मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीच देवेंद्र फडणवीस आहे, मग मला माझ्या मतदारसंघात येण्याची गरज आहे का? असा सवाल त्यांनी मतदारांना केला. इथली निवडणूक तुम्ही सर्वजण सांभाळत आहात त्यामुळे मी आता प्रचाराला येणार नाही. तुम्हीच माझी निवडणूक लढवा असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या सभेत एका बाजूला त्यांनी नागपुरात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश कसा मजबूत आणि सुरक्षित होत आहे, हे ही त्यांनी प्रचार सभेत सांगितले.