महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईंची फसवणूक; गेल्या दहा वर्षांमध्ये उकळले अडीच कोटी रुपये.. - Sharad bobade mother fraud

Sharad bobade mother cheated
सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईंची फसवणूक; गेल्या दहा वर्षांमध्ये उकळले अडीच कोटी रुपये..

By

Published : Dec 9, 2020, 1:49 PM IST

Updated : Dec 9, 2020, 6:59 PM IST

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईंची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक

13:44 December 09

सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या आईंची फसवणूक; गेल्या दहा वर्षांमध्ये उकळले अडीच कोटी रुपये..

नागपूर -सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईंची एका व्यक्तीने अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांची आई मुक्ता बोबडे या वृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत, गेल्या 10 वर्षांपासून आरोपी तपस घोषकडून त्यांची फसवणूक करण्यात येत होती. प्रकरण संवेदनशील असल्याने फसवणूक केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आरोपी घोषला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अतिशय गोपनीयतेने तपास करत असल्याचे दिसून येत आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबीयांच्या रिकाम्या प्लॉटवर (वडिलोपार्जित स्थावर संपत्ती) दहा वर्षांपूर्वी सिजन लॉन तयार करण्यात आले होते. या लॉनची देखभाल आणि इतर कामांकरीता तपस घोषची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शरद बोबडे यांच्या आई वृद्ध आणि आजारी असल्याने त्या व्यवहाराकडे लक्ष देऊ शकत नव्हत्या. याचा गैरफायदा घेऊन घोषने हिशोबात घोळ करायला सुरुवात केली.

बनावट पावत्या तयार करुन हेराफेरी

न्यायाधीश शरद बोबडे हे देखील व्यस्त असल्याने त्यांनी घोषवर विश्वास ठेवला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घोष यांनी केलेला घोळ लक्षात आल्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या तपासात घोष यांनी लॉनच्या किरायापोटी मिळणाऱ्या रकमेमध्ये बनावट पावत्या तयार करून हेराफेरी केल्याचे उघड झाले.  

अडीच कोटींची फसवणूक

आरोपी घोषला रात्री उशिरा अटक करण्यात आली. फसवणुकीचे प्रकरण देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबाशी निगडीत असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यापासून अतिशय बारकाईने तपास केला. हिशोबातील प्रत्येक खर्च तपासण्यात आला. त्या आधारेच फसवणूकीची रक्कम ही सुरवातीच्या तपासात अडीच कोटी रुपये असल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

सध्या एका आरोपीला झाली आहे अटक

यासंदर्भात माहिती देताना पोलिस उपायुक्त विनिता साहू म्हणाल्या, की या प्रकरणी चौकशी करुन आम्ही सध्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याला कोर्टात सादर करण्यात आले. त्याचे नाव तपन घोष आहे. गेल्या १३ वर्षांपासून तो लॉनचा मॅनेजर म्हणून काम करत होता. सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक असल्याचे सध्या करण्यात आलेल्या तपासात पुढे येत आहे.

कोण आहेत शरद बोबडे

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी देशातील विविध ऐतिहासिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका वठवली. अयोध्या निकाल प्रक्रियेमध्येही त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सरन्याधीशपदाची त्यांची कारकीर्द ही १७ महिन्यांची राहणार आहे. ते सरन्यायाधीश पदावरून २३ एप्रिल २०२१ ला निवृत्त होतील. रविवारी १७ नोव्हेंबरला विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे सेवानिवृत्त झाले. त्यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी. यासाठी न्याय मंत्रालयाला पत्र लिहून शिफारस केली होती. न्या. बीपी गजेंद्रगडकर, न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदाचा मान तिसऱ्यांदा महाराष्ट्राला मिळणार आहे.

वकील कुटुंबात जन्म

न्या. बोबडे यांचा जन्म नागपूर येथे २४ एप्रिल १९५६ रोजी वकील कुटुंबात झाला. त्यांचे वडील अरविंद बोबडे यांनी महाराष्ट्राचे अ‌ॅडव्होकेट जनरल पद भूषवले आहे. न्या. बोबडे यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९७८ साली ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य बनले आणि १९९८ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली.

मध्ये प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमुर्ती

त्यानंतर, मार्च २००० मध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणूनही त्यांची निवड झाली. त्यानंतर, १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.१२ एप्रिल २०१३ ला त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अर्जन कुमार सिकरी यांचाही शपथविधी पार पडला होता. २०१६ साली नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. यासोबतच नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणारे बोबडे हे नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती झाले.

Last Updated : Dec 9, 2020, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details