नागपूर- हुतात्मा जवान भूषण सतई यांच्यावर नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १३ नोव्हेंबरला श्रीनगर येथील गुरेज सेक्टर येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये भूषण यांना वीरमरण आले होते. रविवारी रात्री भूषण यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूर आणण्यात आले होते. रात्रभर पार्थिव कामठी येथील गार्ड रेजिमेंट येथे ठेवण्यात आले होते. लष्कराकडून मानवंदना दिल्यानंतर आज भूषण यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अलोट जनसागर लोटला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सुनील केदार आणि नितीन राऊत हे देखील उपस्थित होते.
आज सकाळी वीरजवान भूषण याचे पार्थिव त्याच्या घरी आल्यानंतर संपूर्ण फैलपूर परिसरात भूषण सतई अमर रहे च्या घोषणांनी निनादून गेला होता. याच वेळी नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या. त्यानंतर भूषण यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. कोटोलमध्ये भूषण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.