नागपूर -कोरोनाच्या संकटात एकीकडे अनेक लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवाभावाच्या उद्देशाने अहोरात्र कार्य करत आहेत. तर काही ठिकाणी रक्ताचे नातेच जाणीवपूर्वक अंतर राखत असल्याचे अनेक उदाहरण देखील बघायला मिळत आहे. नागपूरच्या रेशीमबाग परिसरात कोरोनामुळे 96 वर्षीय आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवल्याची घटना समोर आली आहे. एवढंच काय तर आईच्या अस्थींचाही त्यांनी स्वीकार केला नाही. मानवतेला मान खाली घालायला लावणारी घटना नागपूर शहरात घडल्याने समाजातून चीड व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिनाभरापासून नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनामुळे हजारो रुग्णांचे प्राण गेले आहे. यापैकी बहुतांश रुग्ण हे दवाखान्यात दगावले असले तरी उपचाराअभावी अनेकांनी राहत्या घरीच शेवटचा श्वास घेतला आहे. अशाच एका कोरोनाग्रस्त 96 वर्षीय वृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ही महिला तिच्या लेकीसोबत राहायची. दोघींनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, लेकीने आईला वाऱ्यावर सोडून मैत्रिणीच्या घरी जाऊन राहणे पसंत केले. या दरम्यान, आजारी असलेल्या वृद्ध महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. दोन दिवसांपासून मृतदेह घरात पडून राहिल्याने दुर्गंधी सुटली होती. याबाबत परिसरातील नागरिकांनी वृद्ध महिलेच्या मोठ्या मुलाला संपर्क केला तेव्हा त्याने मी येऊ शकत नसल्याने परस्पर अंत्यसंस्कार आटोपून घेण्याचे उलट उत्तर त्यांना दिले. त्यानंतर मुंबईत राहणाऱ्या दुसऱ्या मुलाला संपर्क करण्यात आला. मात्र, तो उपलब्ध होऊ शकला नाही. कुणीही पुढे येत नसल्याने परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेला या संदर्भात माहिती दिली. तेव्हा महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर अस्थी घेण्यासाठी पुन्हा त्या महिलेच्या मुलांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.