नागपूर - उघड्या विद्युत डीपीच्या तारेचा स्पर्श झाल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना काल (गुरुवारी) 4 वाजताच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्सी येथे घडली. नैतिक पुजाराम बावणे (३ वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
काय आहे घटना ?
गुरुवारी नैतिकची प्रकृती चांगली नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात न्यायचे होते. नैतिकचे वडील हे मासेमारीचा व्यवसाय करत असल्याने ते घरी नव्हते. यामुळे नैतिकची आजी पुष्पा यांनी त्याला गावातील दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दवाखान्यात घेऊन जात असताना यावेळी नैतिकला शौचास जायचे असल्याने त्याला रस्त्याच्या कडेला बसवले. तेथे एक गाय नैतिकच्या दिशेने येत असल्याने आजी हकलण्यासाठी गेली. याचदरम्यान नैतिकच्या पाठीमागे असलेल्या उघड्या डीपीच्या तारेचा त्याला स्पर्श झाला. तेथेच त्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. त्याच्या आजी पुष्पा यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर लागलीच नैतिकला सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी नैतिकला मृत घोषित केले.