नागपूर - येत्या 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून जनतेच्या भेटीला येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेच्या भेटीला - चंद्रशेखर बावनकुळे या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील संत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी गावातून १ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या यात्रा प्रेमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला वेगळे करू शकलेले नाहीत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील महिना भर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या 5 वर्षातील कामांचा लेखा-जोखा जनतेपुढे सादर करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत विजयी पताका रोवल्यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभेचे वेध लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या पक्षांत्तर योजना यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नव्या मोहिमेवर निघणार आहेत.
या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्यातील मतदारांसमोर सरकारच्या 5 वर्षातील कामांचा आढावा सादर करतील. या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार असल्याची माहितीही मंत्री बावनकुळे आणि आमदार अनिल सोले यांनी दिली आहे.
पहिल्या दिवशी दरेगाव येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत होईल. त्यानंतर आर्वी येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पूलगावला स्वागत सभा आणि रात्री ८ वाजता वर्धा येथेही जाहीर सभा होणार आहे, असा मुख्यमंत्र्यांचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम राहणार असल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी दिली.