महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर समारोप करणार उपमुख्यमंत्री - 96th inauguration of Marathi Sahitya Sammelan

वर्धा येथे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान स्वावलंबी मैदानावर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर असणार आहेत. तर संमेलनाचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

Marathi Sahitya Sammelan
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

By

Published : Jan 27, 2023, 12:39 PM IST

नागपूर :विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या भव्य मैदानावर आयोजित संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर स्वागताध्यक्ष दत्ता मेघे असतील अशी माहिती विदर्भ साहित्‍य संघ व कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.

8 वाजता ग्रंथदिंडी :मुख्य सभामंडपाला आचार्य विनोबा भावे यांचे तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आले आहे. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.



समारोपाला उपमुख्यमंत्र्यी :संमेलनाचा समारोप रविवार 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. रा. जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.



मुलाखत व मुक्त संवाद :शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद सिरसाट व विवेक सावंत घेतली. याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता प्रसिद्ध मराठी सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे व कवी सौमित्र किशोर कदम यांचा सहभाग असलेला मुक्त संवाद हा कार्यक्रम होणार आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे अध्यक्षस्थानी राहणार असून संवादक बालाजी सुतार राहतील.



परिसंवाद आणि परिचर्चा :या संमेलनात मनोहर म्हैसाळकर सभामंडप व आचार्य विनोबा भावे सभामंडपामध्ये तीन दिवस एकूण तेरा विषयांवर परिसंवाद होणार आहे. त्यात कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेत्तर साहित्याची वाढती लोकप्रियता, विदर्भातील बोलीभाषा, भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, वैदर्भीय वाडमयीन परंपरा, गांधीजी ते विनोबाजी:वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून, वाचन पर्यायाच्या पसा-यात गोंधळलेले वाचक, वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयांचा समावेश आहे. स्त्री-पुरुष तुलना (ताराबाई शिंदे) विषयावर परिचर्चा होणार आहे. तसेच संमेलनाध्यक्षांचे भाषण व त्यावर चर्चादेखील होईल.



कवितेचा जागर :निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन 3 तारखेला रात्री 8.30 जयराम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. रात्री 8 8 वाजता मृद्गंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा हा विदर्भ साहित्य संघाची प्रस्तुती असलेला कार्यक्रम होणार आहे. दुसरे कविसंमेलन 4 तारखेला रात्री 8.30 वाजता श्याम माधव धोंड यांच्या अध्यक्षतेत होईल. शिवाय, गझलकट्टा, कविकट्ट्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून आलेले सुमारे 900 कवी तीन दिवस कवितेचा जागर करणार आहेत. 3 तारखेला दुपारी 2 वाजता डॉ. सुनंदा गोरे यांच्या अध्यक्षतेत कथाकथन होईल.

290 ग्रंथदालने: रंगदृष्टी प्रस्तुत 'गावकथा' हा एकांक, युवक बिरादरीचा 'तीर्थधारा' तसेच, श्याम गुंडावार व श्याम सरोदे यांचा 'अभंगधारा' असे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील संमलेनादरम्यान होणार आहेत. ग्रंथप्रदर्शन व वाचन मंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरीत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकुण 290 ग्रंथदालने राहणार आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गोवा येथील राजहंस, मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, मेहता, रोहन, दिलीपराज, साधना इत्यादी प्रकाशनांची पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. याशिवाय, वाचन मंच, बालसाहित्य मंच, बसोली ग्रुप व स्कुल ऑफ स्कॉलर्सतर्फे चित्रकाव्य प्रदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मराठी रसिक, वाचकांना मिळणार आहे.




हेही वाचा : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

ABOUT THE AUTHOR

...view details