नागपूर :उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसुला जाणार आहेत. अशी घोषणा त्यांनी वज्रमुठ सभेत केली. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'उध्दव ठाकरे हे नाटकबाज आहेत. ते नौटंकी करत आहेत. हा स्थानिकांसह सरकारचा प्रश्न आहे. ठाकरे यांची कोकणात शक्ती राहिलेले नाही, त्यामुळे त्यांची ही धडपड आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे निराश दिसत होते. त्यांनी त्यांचा भाषण लिहून देणारा बदलला पाहिजे. उद्धव ठाकरे हे केवळ बाळासाहेबांचे नावचं घेऊ शकतात. उद्धव ठाकरेंचे कर्तुत्व काहीच नाही आणि ते अमित शहांना चॅलेंज करतात. कलम 370 रद्द केल्यावर याच उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचे अभिनंदन केले होते. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीवर बसून त्यांना चॅलेंज करत आहेत'.
मे महिन्यात संघटनेत बदल : नेहमीचइलेक्शन मोडवर असलेल्या भारतीय जनता पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील. त्या आधी भाजप नेतृत्वात बदल होणार आहेत, असे संकेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बावनकुळे म्हणाले की, 'पक्षात दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारणीची पुनर्रचना होत असते. मी ऑगस्ट 2022 मध्ये अध्यक्ष झाल्यावर नवी कार्यकारणी अपेक्षित होती. आता उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यांची नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे. आमचा 48 लोकसभा सीट आणि 200 हून अधिक विधानसभा सीट जिंकण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला यात यश मिळेल यादृष्टीने फेरबदल केले जात आहेत. जुनी आणि नवीन कार्यकारणी आणि मागच्या निवडणुका यात काहीचं संबंध नाही. 288 विधानसभा क्षेत्राचे समन्वयक लवकरच जाहीर करणार. मे महिन्यात संघटनेत बदल करण्यात येतील', असे बावनकुळे म्हणाले आहेत.