नागपूर :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर आपली भूमिका मांडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, आळंदी येथे पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला नाही. राजकीय पक्षांनी यावर राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
'आम्ही राजकारण केले नव्हते' : बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, 'मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी देखील अशीच घटना घडली होती. मात्र त्यावरून आम्ही राजकारण केले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे. विरोधकांना राजनीती करायची असेल तर त्यांनी करावी, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात भाजप नाक खुपसत नाही :भारतीय जनता पक्षकोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करत नाही, असे बावनकुळे म्हणाले. 'कोणाला मंत्री करायचे, कोणाला नाही हे अधिकार एकनाथ शिंदेंकडे आहेत. त्यांच्या या अधिकारात भाजप कधीच नाक खुपसत नाही. आमचे युतीचे सरकार आहे, त्यामुळे भाजपकडून कोण मंत्री होईल आणि कोण नाही हे भाजप ठरवेल', असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी समाजात तेढ निर्माण करत आहे :चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली.तेम्हणाले की, जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सत्तेच्या बाहेर गेले, तेव्हा त्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. जर शरद पवार यांनी ट्विट केले नसते तर संभाजीनगरची घटना घडली नसती. जर बंटी पाटील काही बोलले नसते, तर कोल्हापूरमध्ये काही घडले नसते. ते जेव्हा विरोधी पक्षात जातात तेव्हा त्यांना ओबीसी - धनगर आठवतात, सत्तेत गेल्यावर मात्र उद्योगपती दिसतात. हे विरोधी पक्षात गेल्यावर आपला पक्ष टिकवून ठेवण्यासाठी समाजात तेढ निर्माण करतात. मात्र काँग्रेस - राष्ट्रवादीने तयार केलेलं कन्फ्युजन आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
- Lathi Charge on Warkari : पोलीस अधिकाऱ्यांनी फेटाळले वारकऱ्यांवरील लाठीचार्जचे आरोप; वारकरी वर्गात संताप
- Lathi Charge On Varkari : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलीस आयुक्त म्हणतात फक्त किरकोळ झटापट, विरोधी पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया