नागपूर : काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख कर्नाटकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी काही घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी सीमाबांधवांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता संजय राऊत, उद्धव ठाकरे गप्प का, आता हे झोपलेत का असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या प्रतिक्रियेची आम्ही सर्व वाट पाहत आहोत. उद्धव ठाकरे तर अशा विषयी लवकर प्रतिक्रिया देत होते. धीरज देशमुख यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
ठाकरेंना सहानुभूती मिळणार नाही : उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठे करण्यासाठी पैशांचा गैरवापर केला जातो. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पाठवले जाते. उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभती आहे, असे दाखवण्याचा तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहे. आता त्यांना सहानुभती मिळणार नाही. राहीलेले आमदार, खासदार लोकप्रतिनिधी टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे दौरे करत आहेत. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्त्वाशी समझोता केला म्हणून कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
नाना पटोलेंनी टीका करू नये : होळी रंगाची उधळण करणारा उत्सव आहे. या दिवशी सर्वांनी जुने वाद विसरावे. त्यामुळे नाना पटोले यांनी किमान होळीच्या दिवशी टिका करु नये, आज तरी त्यांनी पक्ष फुटतोय ते थांबवावे. नाना यांनी होळीसमोर नतमस्तक होऊन काँग्रेस फुटू नये, अशी प्रार्थना करावी, असा टोला बावनकुळेनी नाना पटोलेंना लावला आहे.