महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2020, 8:42 PM IST

ETV Bharat / state

तर वीज बिलासाठी शिमगाही करू; वीजबिलांच्या होळीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

कोरोना लॉकडाऊनमुळे वीज मीटरची रिडींग घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे ग्राहकांना अंदाजे वीजबिले देण्यात आली. वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावरून आता भाजपा आक्रमक झाली आहे. त्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत.

electricity bills
वीज बील

नागपूर -वाढीव वीज बिले तत्काळ रद्द करा. अन्यथा आता फक्त बीलाची होळी केली, यापुढे वीज बिल माफ झाले नाही तर शिमगाही करू, असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. वाढीव वीज बिलांच्या प्रश्नांवरून भाजपाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातही कोराडीसह विविध ठिकाणी आंदोलन करत वीज बिलाची होळी करण्यात आली.

वाढीव वीज बिल हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक ठरत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. याचा निषेध म्हणून राज्यभरात भाजपाने आंदोलन पुकारले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. राज्य शासनाने कोणत्याही नागरिकाच्या घरचे वीज कनेक्शन कापले तर त्याच ठिकाणी झेंडे घेऊन आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. हे सरकार थकबाकीच्या मुद्द्यावरून बनवाबनवी करत आहे. याचा वीज बिलाच्या वाढीशी काही संबंध येत नाही. त्यामुळे सरकारमधे धमक असेल तर थकबाकीची खुशाल चौकशी करावी. मात्र, त्या अगोदर ५ हजार कोटी रूपये वीज कंपनीला देऊन ३०० युनीटपर्यंतची वीज बिले माफ करा. सोबतच ऊर्जामंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे १०० युनीटपर्यंतची बील माफी देण्याच्या आश्वासनाचेही पालन करा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

दुसरीकडे भाजपा शहराध्यक्ष व आमदार प्रविन दटके यांच्या नेतृत्वातही शहरातील तुळशीबाग परिसरात वीज बीलाची होळी करून सरकारचा तिव्र निषेध करण्यात आला. राज्य सरकारने आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणली आहे. वेळ प्रसंगी आम्ही तुरूंगात सुद्धा जाऊ परंतु अन्यायकारक वीज बिले स्विकारणार नाही. यासाठी संघर्ष करत राहणार असेही आमदार प्रविन दटके यांनी सांगितले. आत्तापर्यत भाजपा कडून वीज बिला विरोधात ९ वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र तरीही हे सरकार जागे का होत नाही ? असा सवालही यावेळी दटके यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details