महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 4, 2019, 10:30 PM IST

ETV Bharat / state

चंद्रशेखर बावनकुळेंची ऊर्जा कुणी अन् का काढून घेतली?

चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? याचे कारण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, राजकीय वर्तुळात या विषयावरून बऱ्याच चर्चां होत आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर- 'राज्याचे ऊर्जामंत्री कर्तुत्वान आहेत. त्यांना मंत्रालयातील बारकावे माहीत आहेत. त्यांना हवा तसा जीआर काढून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे,' अश्या प्रकारच्या प्रमाणपत्रांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बावनकुळे यांचा गौरव करायचे. अगदी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला आले असताना त्यांनी बावनकुळे यांचे तोंडभरून कौतुक केले होते. मग ऐन वेळी माशी कुठे शिंकली? ज्यामुळे रिक्षा चालक ते कॅबिनेट मंत्री पदाचा प्रवास करणाऱ्या बावनकुळे यांच्यासाठी होत्याचे नव्हते झाले.

नागपूरच्या विकासात आणि राजकारण बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय नागपूरचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अशा वल्गना करणाऱ्यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांना खऱ्या अर्थाने बेरोजगार केले आहे. बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. यामुळे बावनकुळे समर्थक तीव्र नाराज झाले आहेत. आमच्या साहेबांचे काय चुकले याचा जाब त्यांना हवा होता. यासाठी त्यांनी बावनकुळे यांच्या घराशेजारी घेराव घातला. मात्र, पक्षाने त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? याचे कारण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, राजकीय वर्तुळात या विषयावरून बऱ्याच चर्चा होत आहेत.

  • बावनकुळे यांचा तापट स्वभाव आहे. याच स्वभावामुळे अधिकारी वर्गात नाराजी होती. अनेक अधिकारी त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याचे बोलले जात होते. या संदर्भात मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच बावनकुळे सारख्या दिग्गज नेत्यांची उमेदवारी नाकारण्याचे धाडस पक्षाने दाखवले आहे.
  • कॅबिनेट मधील सर्व निर्णय गडकरी यांना सांगितल्याची चर्चा देखील राजकीय आणि विचारवंतामध्ये सुरू आहे.
  • गडकरी-फडणवीस अंतर्गत वादाचा फटका बावनकुळे यांना बसला आहे. बावनकुळे गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात.
  • भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातील लोकांची कामे प्राथमिकता देऊन करत असल्यासाने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी.
  • बावनकुळे यांच्या तक्रारी थेट अमित शाहंपर्यंत गेल्याने दिल्लीतील नेतृत्व बावनकुळेंवर नाराज आहे.
  • केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत सुद्धा बावनकुळे यांचे संबंध ताणले गेले होते. ज्याचा फटका आज त्यांना बसला असावा, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे

यासह अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र, खऱ्या कारणांबद्दल भाजप पक्षश्रेष्ठी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाच माहिती असेल. 'एक सामान्य रिक्षा चालकाला जि.प. सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही,' अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व नाट्यमय आणि सस्पेन्स ताणणाऱ्या घडामोडी घडल्यानंतर दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details