नागपूर :काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट म्हणजेच महाविकास आघाडीची वज्रमुठ दिवसेंदिवस मजबूत होत असताना त्या समोर टिकाव धरता यावा, यासाठी भाजपचे नेते आत्तापासूनच कामाला लागले आहे. राज्यात भाजप 25 लक्ष युवा वॉरीअर तयार करणार असून 18 ते 25 वर्षे या वयोगटातील युवा वॉरीअर राहणार आहेत. राज्यातील अनेक महापालिका, जिल्हा परिषद निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसमुळे थांबल्या आहे. राष्ट्रवादीचे काही नेते-कार्यकर्ते कोर्टात गेल्याने या निवडणूका थांबल्या आहेत. राष्ट्रवादीकडून कोर्टातून प्रकरण मागे घेतल्यास निवडणूका कधीही लागू शकतात, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
विधानसभा-लोकसभा एकत्र नाहीत :महाविकास आघाडी लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होतील, या दृष्टीने कामाला लागले आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक या एकत्र घेण्याची कुठलीही चर्चा नाही. आज तरी दोन्ही निवडणूका एकत्र होतील अशी शक्यता दिसत नाही.
भाजपला महाराष्ट्रात आत्मचिंतन करण्याची गरज नाही :कर्नाटक निवडणुकीच्या निकालनंतर भाजपला महाराष्ट्रात आत्मचिंतन करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात काही घडले नाही. राज्यात भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे. कर्नाटकचे पक्षीय राजकारण, मुद्दे हे महाराष्ट्रापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्राचा संबंध नाही. प्रत्येक निवडणुकीचे समीकरण वेगळे आहेत.