नागपूर - पारशिवनी तालुक्यातील सालई-माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानाची पाहाणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी आज केली. पारशिवनी तालुक्यात ग्रामीण पायाभूत विकास निधीतून मनसर- माहुली-सालई- बिटोली येथील पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम २०१८ रोजी पूर्ण करण्यात आले होते.
केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहाणी... चार महिन्यांनंतर 'सरकारी बाबू' बांधावर मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ ऑगस्ट २०२० रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे अचानक आलेल्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलींद बांधवकर, सहाय्यक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए. एस. महाजन, यांच्यासह मंडळ अधिकारी मंडळ राजेश घुडे, तलाठी विश्वजीत पुरामकर पाहणी पथकामध्ये आहेत.
चार महिन्यांनंतर काय साध्या होणार?
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले होते. या पुरात उमरेड, कामठी, कन्हान, मौदा परशिवानीसह कुही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तर शेकडो घरे पडली होती. आज तब्बल चार महिन्यांनी केंद्राचं पथक पाहाणीसाठी दाखल झाले आहे. आता यातून नक्की काय साध्य होणार,असा प्रश्न शेतकरी विचारात आहेत.
मान्सून लांबल्याने पूर परिस्थिती
या वर्षी देशातील मान्सून लांबल्याने सर्वत्र पूर परिस्थिती होती. त्यामुळे राज्यातील नद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यातच यंदा अरबी समुद्र आणि हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणी पातळी आणखी वाढली. यामुळे पुन्हा विसर्ग करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी शिरलं आणि यामुळे पीकं उद्ध्वस्त झाली.