नागपूर - नागपूर विद्यापिठात सुरू असलेल्या राजकारणाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खडेबोल सुनावले. ते विद्यापिठाच्या क्रीडांगणात उभारल्या जाणाऱ्या सिंथेटिक ट्रॅकच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
'यावेळी विद्यापिठाच्या जागेचे रक्षण करा. तुमच्याकडून होत नसले तर मला सांगा. विद्यापिठाच्या जागेवर अतिक्रमण करून खोटी कागपत्रं सादर करून जागा बळकावली होती. अनेकांनी बियर बार उघडले होते. न्यायालयात जाऊन लढलो आणि जागा परत मिळवली. यामुळे या जागेचे संरक्षण करून योग्य उपयोग करा', असे नितीन गडकरींनी यावेळी म्हटले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात उत्तम भर
सिंथेटिक ट्रॅक तयार व्हावे असे अनेक वर्षाचे स्वप्न होते. अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आल्याने नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात उत्तम भर पडली आहे. 8 कोटी रुपये खर्चून हे सिंथेटिक ट्रॅक तयार होणार आहे. विद्यापीठ क्रीडांगण परिसरात सुभेदार हॉलच्या पुढे हा सिंथेटिक ट्रॅक तयार होत आहे. खेळाडूंना याचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात ऑलिम्पिकच्या दृष्टीने खेळाडूंना तयारी करण्यासाठी याची मोलाची मदत ठरणार आहे.
'एलआयटीच्या विकासाकडे भर द्या'
लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलीने (एलआयटी) किती गोंधळ केला आहे, म्हणत स्पष्ट नाराज असल्याचे गडकरी यावेळी बोलून गेले. 'एलआयटीला ना निधी देत ना प्राध्यापक देत, त्यांच्या मागण्यांची पूर्तता करत नसल्याने त्यांना काम करता येत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे इन्स्टिट्यूट, त्याचा चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे अशी इच्छा आहे. या विद्यापिठाचे माजी विद्यार्थी आहेत ते 100 कोटी डोनेट करायला तयार आहेत. पण कोणाची इच्छाशक्ती नाही. यामुळे माजी विद्यार्थ्यांची मदत घेऊन हे कॅम्पस विना सरकारी मदतीशिवाय उत्तमरित्या उभे होऊ शकते. आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ मंडळाने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
'नागपूर विद्यापिठात शिक्षणापेक्षा जास्त राजकारणच'
'नागपूर विद्यापिठात राजकीय क्षेत्रापेक्षा जास्त राजकारण चालते. राजकीय क्षेत्रात काही लोक कमी शिकलेले असल्याने कमी राजकारण चालते. पण या विद्यापिठात सर्वच्या सर्व लोक शिकलेले असल्याने सर्वांचा वेळ राजकारणात जातो, अशी समाजामध्ये घृणा आहे. लोकांना या सर्वांचा कंटाळा आला आहे. लोकांच्या मनात विद्यापिठाबद्दल चांगली भावना नाही, त्यापैकी एक मी सुद्धा आहे', अशा शब्दात गडकरी यांनी सुरू असलेल्या विद्यापिठाच्या राजकारणावर बोलून नाराजी व्यक्त केली.
'विद्यापिठाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करा'
'विद्यापिठात उच्च शिक्षण, गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करण्यासाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरीं आणि प्रकुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्याकडून प्रयत्न कराल', अस विश्वासही गडकरींनी बोलून दाखवला.
हेही वाचा -Raj Kundra Case : राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी जप्त केले लॉकर