नागपूर- दोन दिवसांपूर्वी धावत्या मेट्रोमध्ये अश्लील नृत्या व जुगार खेळण्यात आल्याची घटना घडली होती. या संपूर्ण घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि त्यांचे कार्यकर्ते असल्याचे समोर आल्यानंतर आज (दि. 23 जाने.) महामेट्रोने त्यांच्या विरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे.
पवारांनी घेतली पत्रकार परिषद
त्यानंतर राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर विविध समाज माध्यमांवरून आयोजकांवर टीकेची झोड उठली असताना देखील प्रशांत पवार आपली चूक मानायचा तयार नाहीत. उलट त्यांच्याकडे आपली बाजू पटवून देण्यासाठी आपलेच तर्क आहेत.
'सेलिब्रेशन ऑन व्हील्स' ची माहिती
महामेट्रोतर्फे नागरिकांकरता 'सेलिब्रेशन ऑन व्हील्स' ही अनोखी योजना राबवली जात आहे. याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. फक्त 3 हजार 50 रुपयेमध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व या सारखे इतर कार्यक्रम साजरा करू शकतात. या योजनेचा नागपूरकर मनस्वी आनंद घेत या माध्यमाने आपल्या आयुष्याचे कहाणी महत्वाचे दिवस आपल्या परिवारासोबत घालवत होते. आजपर्यंत सुमारे 60 परिवारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या शिवाय स्थानिक उद्योजकांसह अनेकांनी आपल्या स्वकीयांचा वाढदिवस मेट्रोमध्ये साजरा केला होता. कौटुंबिक जिव्हाळ्याच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचे काम काही समाजकंटकांनी केले आहे. हे चिथावणीखोर कृत्य जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात येत आहे.
प्रशांत पवार यांचे तर्क
महा मेट्रोकडून प्रशांत पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, दहा हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची सुरक्षा किती कुचकामी आहे. हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रसार माध्यमांनी या संदर्भात आमची भूमिका योग्य प्रकारे समजून घेतलेली नाही. आम्ही हा सर्व प्रकार करत असताना सुरक्षा रक्षकांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न का केला नाही, असे देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा -कारागृहातील बंदीवानांना चरस पुरवणारा कर्मचारी निलंबित