नागपूर -नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत प्रमुख नेत्यांसह उमेदवारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे गरजेचे - देवेंद्र फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज नागपूर विभागात होत असलेल्या पदवीधर निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ते आज सकाळी मुंबईवरून नागपूरला आले होते. राज्यात होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ही निवडणूक आपल्यासाठी परीक्षा असल्याचे सांगत या परीक्षेत आम्ही चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. या निवडणुकीत मतदान करणारा प्रत्येक मतदार हा पदवीधर आहे. त्यामुळे त्यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ -
नागपूर विभागात होत असलेल्या निवडणुकीत यावर्षी नव्याने मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे मतदार यादीत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मतदार म्हणून ज्या पदवीधरांना आपला अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर केलेला आहे. त्या प्रत्येकाचे नाव मतदार यादीत येणे क्रमप्राप्त होते. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात घोळ दिसून आल्याने निवडणूक आयोगाने या संदर्भात जबाबदारी घेण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.