नागपूर - राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार धुळे, नंदुरबार,अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्यातंर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागेकरिता ७९ उमेदवार रिंगणात आहेत तर पंचायत समितीच्या ३१ जागांकरिता १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत ६ लाख १६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २ लाख ९६ हजार ७२१ स्त्री मतदार आणि ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार आहेत. उमेदवारांकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरूवात झाली आहे.