नागपूर - समर व्हेकेशन म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच नागपुरात घरफोडी ( Nagpur Burglary Increase In Nagpur ) करणाऱ्या चोरट्यांच्या सिजनला देखील सुरुवात झाली आहे. विशेषतः शहराच्या आऊटर भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दुपारच्या वेळेत घरांची रेकी करून कोणत्या घराच्या दाराला कुलूप लावलेलं आहे. कोण बाहेर गावी गेलं आहे, कधी परत येतील या सर्व बाबींचा कानोसा घ्यायचा आणि रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत घरफोड्या करायच्या अश्या प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 20 दिवसांमध्ये शहरातील विविध भागात तब्बल 44 पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. महत्वाचं म्हणजे बहुतांश चोरीच्या घटनेतील घर मालक बाहेरगावी गेलेले आहेत.
घरफोड्यांच्या घटनेत वाढ -घरातील लहान मुलांच्या शाळा, कॉलेज आणि नोकरीच्या व्यापात वर्षभर कुठेही फिरायला जाणे किव्हा बाहेरगावी नातेवाईकांकडे जाण्याची कोणतीही संधीचं मिळत नाही. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताचं अनेक जण मोठ्या हौसेने कुटुंबासह बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात. केवळ चार, आठ दिवसांसाठी बाहेर जाताना घराच्या सुरक्षीतेकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जातं. बाहेरगावी जाताना केवळ शेजारच्यांना घरावर लक्ष द्या, अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात. मात्र,कितीही उपाय-योजना केल्या तरी चोरटे चोरट्यांच्या नजरा कुलूप बंद असलेल्या घरांवर खिळलेल्याचं असतात. संधी मिळताचं ज्या घराच्या मुख्य दाराला कुलूप लागलेलं आहे, अश्या घरांना टार्गेट करून घरातील लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवचं लंपास केला जातो. नागपूर शहराच्या सीमावर्ती भागात गेल्या वीस दिवसांमध्ये अश्या प्रकारच्या घरफोड्या घटना सातत्याने वाढत आहे. या महिन्यात वीस दिवसांमध्ये नागपूर शहरात 44 पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना घडलेले आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी बहुतांश घराचे घर मालक हे बाहेरगावी फिरायला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील आउटर भाग चोरांच्या टार्गेटवर -नागपूरचा विस्तार वेगाने होतो आहे. शहराची सीमा विस्तीर्ण होत असल्याने आउटर भागात घरांची संख्या विरळ आहे, याचाचं फायदा घरफोडी करणारे चोर घेताना दिसत आहेत. यामध्ये हुडकेश्वर आणि बेलतरोडी भागांचा समावेश आहे तर शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या बजाजनगरमध्ये सुद्धा चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.