नागपूर :चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेत भारतीय संघ 8 दिवसांपुर्वीच दाखल झालेला आहे. भारतीय खेळाडूंनी व्हीसीएच्या जुन्या सिव्हिल लाइन्स मैदानावर सराव केला. त्यानंतर आता जामठा येथील मैदानावर सराव सुरू आहे. उद्यापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट देखील सराव करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आलेला आहे. कसोटी मालिकेतील पहिलाच सामना फेब्रुवारी महिन्यात नागपुरात खेळला जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनंतर नागपूरकर क्रिकेटप्रेमींना कसोटीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
पाच वर्षानंतर कसोटी :नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तब्बल पाच वर्षांनंतर कसोटी सामना होत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. जामठा स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ १४ वर्षांनंतर नागपुरात कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये या नव्या स्टेडियमवरील पहिलाच कसोटी सामना खेळला गेला होता, ज्यात भारताने कांगारूंचा १७२ धावांनी धुव्वा उडवून चार सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती.
असा आहे कसोटी सामन्याचा शेड्युल:बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिली कसोटी ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान जामठा स्टेडियमवर रंगणार आहे. तर दुसरी कसोटी दिल्ली येथे, तिसरी कसोटी धर्मशाला येथे, तर चौथी व शेवटची कसोटी लढत अहमदाबाद येथे खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सुमारे आठ दिवसांपूर्वीच नागपुरात दाखल झालेला आहे. पाच दिवसांचा कसोटी सामना केल्यानंतर १४ फेब्रुवारीला दोन्ही संघ दिल्ली करिता रवाना होती. भारतीय संघ एकूण 14 दिवस नागपूरच्या मुक्कामी असणार आहेत.