नागपूर -आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करत तसे संकेत देखील दिले होते. या विषयी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की या सर्व प्रक्रियेला अजून वेळ आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.
नवीन मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली वारीवर -
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीवरून नागपूरला शनिवारी सकाळी आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस यांच्या दिल्ली भेटी वाढल्या आहेत, यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी नवीन मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आणि काही कामांसाठी मी दिल्लीत गेलो होतो, काही केंद्र सरकारमध्ये कामे असतात. त्यामुळे दिल्लीच्या वारी वाढल्याचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे सोबत युतीचा निर्णय योग्य वेळी योग्य घेण्यात येईल मात्र याला अजून त्याला वेळ असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांना समजून घ्या -
चंद्रकांत दादा यांचे वक्तव्य पूर्ण समजून घेत नाही, अर्धवट समजून घेता. चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य नीट समजून घेतले पाहिजे. एका रात्रीत काहीही घडू शकते, त्यांनी दिलेल्या संकेताचा अर्थ जो तुम्हाला वाटतोय तोच असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेंस वाढवला आहे.